स्वसंरक्षण प्रशिक्षणातून विद्यार्थिनींना सुरक्षेचे धडे
◾सायबर सुरक्षा, व्यसनमुक्ती व महिला संरक्षणाबाबत जनजागृती
बल्लारपूर,( Rajya Reporter News ) : मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, बल्लारपूर येथे चंद्रपूर पोलीस विभाग व पोलीस स्टेशन, चंद्रपूर यांच्या सहकार्याने स्वसंरक्षण प्रशिक्षण व विद्यार्थी सुरक्षा जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासोबतच त्यांना विविध सुरक्षा उपायांची माहिती देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान जनजागृती रथामधील प्रोजेक्टरच्या माध्यमातून सायबर सुरक्षा, व्यसनमुक्ती आणि महिला संरक्षण यासंदर्भातील माहितीपर व्हिडिओ विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले. त्यानंतर हेड कॉन्स्टेबल बळीराम पवार व पोलीस कॉन्स्टेबल नागेंद्र चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना विविध सुरक्षा विषयांवर मार्गदर्शन केले.
यावेळी हेड कॉन्स्टेबल प्रवीण रामटेके, पोलीस कॉन्स्टेबल अभिषेक आडे तसेच मार्शल आर्ट प्रशिक्षक वाजिद अली यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाच्या विविध तंत्रांचे प्रशिक्षण व प्रत्यक्ष प्रात्यक्षिके देण्यात आली. मार्शल आर्टचे विद्यार्थी साक्षी रणवीर, आर्यन रायपुरे आणि हसरत अली यांनीही प्रात्यक्षिकांमध्ये सहभाग घेत विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे तंत्र समजावून सांगितले.
आजच्या बदलत्या परिस्थितीत विद्यार्थिनींनी सजग, सतर्क आणि आत्मविश्वासू राहणे आवश्यक असून, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत स्वतःचे संरक्षण कसे करावे, याबाबत प्रशिक्षणातून मार्गदर्शन करण्यात आले. तसेच सायबर गुन्ह्यांपासून सावध राहण्याचे आणि व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहनही करण्यात आले.
कार्यक्रमाच्या समारोपानंतर उपस्थित विद्यार्थी व शिक्षकांना ‘सुरक्षा मंत्र’ या पुस्तकाचे वाटप करण्यात आले. या पुस्तकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सुरक्षिततेबाबत अधिक माहिती मिळण्यास मदत होणार आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या प्राचार्या असमा खान यांनी उपस्थित पोलीस अधिकारी, प्रशिक्षक, विद्यार्थी आणि शिक्षकांचे आभार मानले. कार्यक्रमास प्राचार्या, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.










0 Comments