सीपीजे( CPJ ) आंदोलनातील युवकांचा विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे भव्य सत्कार
◾रोहित लोनारे यांची बल्लारपूर तालुका अध्यक्षपदी पदोन्नती
बल्लारपूर ( Rajya Reporter News ) : विदर्भ राज्य आंदोलन समिती (VRAS) बल्लारपूरच्या वतीने सीपीजे आंदोलनात सक्रिय व उल्लेखनीय योगदान देणाऱ्या विदर्भातील युवकांचा भव्य सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. आंदोलनातील कार्याची दखल घेत मयूर मालखेडे, भारत बानीत, प्रियंका चौहान, प्रशांत गद्दला, शशिकांत निरंजने, अमीष मेश्राम, शुभम चिकाटे आणि कशिश वेले यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजुरा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा वीराआंसचे अध्यक्ष वामनराव चटप हे होते. प्रमुख उपस्थितीत विदर्भ राज्य आंदोलन समितीचे पूर्व विदर्भ अध्यक्ष कपिल इद्दे, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष माऊलीकर, जिल्हा उपाध्यक्ष संजय यांच्यासह संघटनेचे विविध पदाधिकारी, युवा कार्यकर्ते, मातृशक्ती आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
यावेळी सत्कारमूर्ती युवकांनी सीपीजे आंदोलनातील आपल्या अनुभवांना उजाळा देत स्वतंत्र विदर्भ राज्याच्या लढ्याला अधिक बळकटी देण्यासाठी सातत्याने कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त केला. उपस्थित मान्यवरांनी युवकांच्या कार्याचे कौतुक करत सामाजिक बांधिलकी जपत जनआंदोलनात सक्रिय सहभाग कायम ठेवण्याचे आवाहन केले.
बैठकीदरम्यान येत्या ९ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त नागपूर येथे आयोजित करण्यात येणाऱ्या भव्य लाँग मार्चबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाची आगामी दिशा स्पष्ट करत विदर्भ राज्याच्या मागणीसाठी मोठ्या संख्येने नागपूर येथे उपस्थित राहण्याचे आवाहन केले.
याच प्रसंगी संघटनात्मक विस्ताराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या बल्लारपूर शहराध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळणारे रोहित लोनारे यांच्या संघटननिष्ठा, कार्यतत्परता आणि नेतृत्वगुणांची दखल घेत त्यांची बल्लारपूर तालुका अध्यक्षपदी पदोन्नती करण्यात आली. या घोषणेचे उपस्थित कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करत त्यांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे आयोजन विदर्भ राज्य आंदोलन समिती सोशल मीडिया सेलचे चंद्रपूर, वर्धा व गडचिरोली विभागीय अध्यक्ष तथा नागभीड तालुका अध्यक्ष पराग गुंडेवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी रोहित लोनारे यांनी विशेष परिश्रम घेतले असून, त्यांच्या कार्याचे उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक केले.
कार्यक्रमाचा समारोप स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीच्या दृढ संकल्पाने करण्यात आला. ९ ऑगस्ट रोजी नागपूर येथे होणारा लाँग मार्च हा स्वतंत्र विदर्भ राज्याच्या आंदोलनाला नवी दिशा देणारा आणि ऐतिहासिक ठरणारा टप्पा ठरेल, असा विश्वास उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.








0 Comments