बल्लारपूर शहरातील एक दंत लॉनमुळे नागरिक त्रस्त; तात्काळ कारवाईची राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी

 




बल्लारपूर शहरातील एक दंत लॉनमुळे नागरिक त्रस्त; तात्काळ कारवाईची राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी

◾वाहतूक कोंडी, ध्वनीप्रदूषण, अस्वच्छता आणि अवाजवी शुल्कामुळे संताप; नियमभंग झाल्यास परवाना रद्द करण्याची राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी

बल्लारपूर, ( Rajya Reporter News ) : बल्लारपूर शहरातील प्रभाग क्रमांक १० मध्ये कार्यरत असलेल्या एका दंत लॉनमुळे परिसरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून, वाहतूक कोंडी, ध्वनीप्रदूषण, अस्वच्छता आणि मनमानी शुल्कामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या पार्श्वभूमीवर नगर परिषद प्रशासनाने तात्काळ चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केली आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी शाहिद शेख यांनी दिलेल्या निवेदनानुसार, संबंधित लॉनमध्ये वाहनतळाची कोणतीही सक्षम व्यवस्था नसल्याने विवाह व इतर कार्यक्रमांच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाहने मुख्य रस्त्यावर उभी केली जातात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन नागरिकांसह आपत्कालीन सेवांनाही अडथळा निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रम संपल्यानंतर उष्टे अन्न, प्लास्टिक व इतर कचरा सार्वजनिक नाल्यांमध्ये टाकला जात असल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरत असून नाल्या तुंबण्याचे प्रकार वाढले आहेत. परिणामी अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे.

तसेच कार्यक्रमांच्या वेळी घरांसमोर मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी केली जात असल्याने ध्वनीप्रदूषणात वाढ होत आहे. याचा सर्वाधिक फटका ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, लहान मुले आणि रुग्णांना बसत असून सार्वजनिक शांतता व कायदा-सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, संबंधित लॉनमध्ये कार्यक्रमांसाठी नागरिकांकडून अवाजवी व मनमानी शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत. त्यामुळे नगर परिषद प्रशासनाने लॉनचा परवाना, आवश्यक सुविधा आणि नियमांचे पालन यांची सखोल चौकशी करावी. नियमांचे उल्लंघन आढळल्यास परवाना स्थगित अथवा रद्द करून सर्व त्रुटी दूर होईपर्यंत लॉन बंद ठेवण्याची कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

प्रभागातील नागरिकांच्या आरोग्य, सुरक्षितता आणि सार्वजनिक हित लक्षात घेऊन नगर परिषद प्रशासनाने तातडीने कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इंजि. राकेश सोमानी, नगरसेवक सुमित उर्फ गोलू डोहने, नगरसेवक प्रणित सातपुते तसेच नगरसेविका प्रतिनिधी शाहिद शेख यांनी केली आहे.




Post a Comment

0 Comments