राजुरा पोलिसांची धडाकेबाज कारवाई; चोरीच्या चार मोटारसायकली जप्त
◾२ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
राजुरा ( Rajya Reporter News ) : मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावत राजुरा पोलिसांनी एका आरोपीला अटक करून त्याच्याकडून चोरीच्या तब्बल चार मोटारसायकली जप्त केल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी सुमारे २ लाख ८० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही कारवाई १३ ऑगस्ट रोजी करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आशिष ऊर्फ रितीक जानकीराम चौधरी (वय २५), रा. सोनापूर देशपांडे, ता. गोंडपिपरी असे आहे.
राजुरा येथील भास्कर चव्हाण यांची मोटारसायकल चोरीला गेल्याची तक्रार राजुरा पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना आरोपीबाबत गोपनीय माहिती मिळाली. त्यानंतर तांत्रिक तपासाच्या मदतीने पोलिसांनी आरोपीचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपीने मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्याच्याकडून चार चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. जप्त वाहनांमध्ये राजुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरी झालेल्या एका मोटारसायकलीसह अजनी (नागपूर शहर), सोनेगाव (नागपूर शहर) आणि घुग्घूस पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरी झालेल्या मोटारसायकलींचा समावेश आहे.
जप्त करण्यात आलेल्या चारही वाहनांची एकूण किंमत सुमारे २ लाख ८० हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध राजुरा पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. आरोपीच्या चौकशीतून मोटारसायकल चोरीच्या आणखी काही घटनांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर काटकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या नेतृत्वात सपोनि लक्ष्मण लोकरे, सफौजदार किशोर तुमराम, राजेंद्र जुमनाके, विक्की निर्वाण, महेश बोलगोडवार, अनुप डांगे, शरीफ शेख, दीपक लालसरे, मिलिंद जांभूळे, रमेश बस्सी, राजीव दुबे आदी पोलिस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.





0 Comments