चंद्रपूर शासकीय रुग्णालयातील सुविधांवर आमदार किशोर जोरगेवार यांचा ‘ऑन द स्पॉट’ आढावा.

 









चंद्रपूर शासकीय रुग्णालयातील सुविधांवर आमदार किशोर जोरगेवार यांचा ‘ऑन द स्पॉट’ आढावा.

◾रुग्णांना दर्जेदार सुविधा द्या; शासकीय रुग्णालयाच्या पाहणीत आ. जोरगेवार यांच्या कडक सूचना


चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील विविध समस्या आणि रुग्णांना मिळणाऱ्या सुविधांचा आढावा घेण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी आज रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी रुग्णालयातील अस्वच्छता, बंद असलेले एसी, कर्मचाऱ्यांची कर्तव्यावर गैरहजेरी तसेच रुग्णांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. रुग्णालयातील सुविधा अधिक सक्षम करण्यासोबतच स्वच्छता, सुरक्षितता आणि सेवा व्यवस्थेत तातडीने सुधारणा करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. निवृत्ती जिवने, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर सोनारकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता विवेक अंबोले, विद्युत विभागाचे उपअभियंता भूषण येरगुळे, भारतीय जनता पार्टीचे माजी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य प्रकाश देवतळे, महामंत्री मनोज पाल, सविता दंढारे, विधानसभा प्रमुख दशरथसिंह ठाकूर, महिला मोर्चा प्रभारी वंदना हातगावकर, बलराम डोडाणी, नगरसेविका सविता कांबळे, सरला कुळसंगे, शीतल गुरनुले, ज्योती जिवने, नगरसेवक भालचंद्र दाणव, जितेश कुळमेथे, नितेश गवळे, अमोल शेंडे, करणसिंह बैस, सुमीत बेले आदी उपस्थित होते.

रुग्णालयातील स्वच्छतेबाबत अनेक तक्रारी प्राप्त होत असल्याचे आमदार जोरगेवार यांनी यावेळी सांगितले. रुग्णालयासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी स्वच्छता ही सर्वोच्च प्राधान्याची बाब असली पाहिजे. मात्र, पाहणीदरम्यान काही ठिकाणी अस्वच्छता आढळून आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. स्वच्छतेची नियमित पाहणी करून रुग्णालयाचा परिसर स्वच्छ आणि आरोग्यदायी ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

यासोबतच काही कर्मचारी आपल्या कर्तव्यावर नियमितपणे उपस्थित राहत नसल्याच्या तक्रारीही प्राप्त होत असल्याचे आमदारांनी सांगितले. रुग्णालयातील प्रत्येक कर्मचाऱ्याने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणे आवश्यक असून, कर्तव्यावर गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.

रुग्णालयातील विविध विभागांमध्ये एसी बंद असल्याच्या बाबीवरही आमदार जोरगेवार यांनी रोष व्यक्त केला. रुग्णालयात उपचारासाठी येणारे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांना गैरसोयीचा सामना करावा लागू नये, यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा सुरळीत ठेवणे गरजेचे आहे. बंद असलेले एसी तातडीने दुरुस्त करून रुग्णांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

रुग्णालयातील शौचालये केवळ रात्री आठ वाजेपर्यंत सुरू राहत असल्याच्या बाबीचीही त्यांनी दखल घेतली. रुग्णालय हे २४ तास कार्यरत असते, त्यामुळे शौचालयांची सुविधा देखील २४ तास उपलब्ध असणे आवश्यक आहे. शौचालये २४ तास सुरू ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले.रुग्णालयाच्या दृष्टीने फायर सेफ्टी हा अत्यंत महत्त्वाचा विषय असून, कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडू नये यासाठी अग्निसुरक्षा यंत्रणा सक्षम आणि कार्यरत ठेवण्याच्या सूचना आमदार जोरगेवार यांनी दिल्या. फायर एक्स्टिंग्विशर, अग्निशमन यंत्रणा, आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग तसेच विद्युत व्यवस्थेची नियमित तपासणी करावी. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना आणि यंत्रणा सज्ज ठेवाव्यात, असेही त्यांनी निर्देशित केले. रुग्णालयात उपचारासाठी येणारा प्रत्येक रुग्ण हा मानसिक आणि शारीरिक त्रासातून जात असतो. त्यामुळे डॉक्टर, परिचारिका तसेच सर्व कर्मचाऱ्यांनी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांशी सौजन्याने, संयमाने आणि आपुलकीने वागणे आवश्यक आहे. रुग्णांना अनावश्यक त्रास होणार नाही तसेच त्यांना त्यांच्या उपचाराबाबत योग्य माहिती मिळेल, याची प्रशासनाने दक्षता घ्यावी, असे आमदार जोरगेवार यांनी स्पष्ट केले.  रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांसाठी स्वच्छ आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था असणे आवश्यक आहे. पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणांची नियमित स्वच्छता करावी तसेच पाण्याची गुणवत्ता तपासून ती सुरक्षित असल्याची खात्री करावी. रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला सहज उपलब्ध होईल, अशी पिण्याच्या पाण्याची उत्तम व्यवस्था करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

रुग्णालय हे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असल्याने येथे उपलब्ध असलेल्या प्रत्येक सुविधेची नियमित देखभाल होणे आवश्यक आहे. रुग्णांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, यासाठी प्रशासनाने तातडीने आवश्यक उपाययोजना करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. केवळ कागदोपत्री कार्यवाही न करता प्रत्यक्षात रुग्णांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे, असे आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

नवजात शिशूंसाठी ह्युमन मिल्क बँक सुरू करणार

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नवजात शिशूंसाठी ह्युमन मिल्क बँक सुरू करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणार असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी सांगितले. नवजात बालकांना आवश्यकतेनुसार सुरक्षित आणि पोषक मानवी दूध उपलब्ध व्हावे, यासाठी ही सुविधा महत्त्वपूर्ण ठरणार असून, त्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.




Post a Comment

0 Comments