बल्लारपूर पेपर मिलची शासन जमा झालेली 19.43 हेक्टर जमीन नगर परिषद बल्लारपूरकडे हस्तांतरित करावे
बल्लारपूर,( Rajya Reporter News ) : दि.२८ ऑगस्ट, २०२६ रोजी, नगर परिषद अध्यक्षा अलका अनिल वाढई, उपाध्यक्ष देवेंद्र आर्य, माजी नगराध्यक्षा छाया मडावी आणि नगरसेवक भास्कर माकोडे यांचा शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी वसुमना पंत यांची भेट घेऊन बल्लारपूर पेपर मिलची शासन जमा झालेली 19.43 हेक्टर जमीन नगर परिषद बल्लारपूरकडे हस्तांतरित करावे या मांगनीचे निवेदन सादर केले.
निवेदनात म्हटले आहे की,बल्लारपूर शहर हे चंद्रपूर जिल्ह्यातील महत्त्वाचे औद्योगिक व नागरी केंद्र असून शहराची भौगोलिक रचना व उपलब्ध भौगोलिक क्षेत्र विचारात घेता भविष्यातील नागरी विकासासाठी नगर परिषदेसमोर जागेची मोठी मर्यादा निर्माण होत आहे.
बल्लारपूर शहराच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करता, शहराच्या एका बाजूस नदीचे क्षेत्र, दुसऱ्या बाजूस वन/जंगल क्षेत्र तसेच काही दिशांना ग्रामपंचायत क्षेत्र असल्यामुळे शहराचा नियोजनबद्ध व आवश्यक त्या प्रमाणात विस्तार करण्यास नैसर्गिक व प्रशासकीय मर्यादा आहेत. परिणामी, वाढती लोकसंख्या, निवासी वसाहती, सार्वजनिक सुविधा, रस्ते, शासकीय/निमशासकीय कार्यालये, क्रीडा व सांस्कृतिक सुविधा, उद्याने, सामाजिक उपयोगाच्या जागा तसेच भविष्यातील विविध नागरी पायाभूत सुविधा यांचे नियोजन करताना नगर परिषदेस उपलब्ध असलेली जमीन अपुरी पडण्याची शक्यता आहे.
बल्लारपूर पेपर मिलची 19.43 हेक्टर जमीन शासन जमा झालेली असून सदर जमीन नगर परिषद बल्लारपूरच्या हद्दीत/शहराच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकते. सदर जमीन नगर परिषदेकडे हस्तांतरित झाल्यास तिचा वापर केवळ नगर विकासाच्या व्यापक व सार्वजनिक हिताच्या उद्देशाने करता येणे शक्य होईल.
सदर जमिनीचा उपयोग प्रधानमंत्री आवास योजना, श्रम साफल्य योजना, वाहनतळ, बाजार (मार्केट) / करीता तसेच भविष्यातील नियोजनबद्ध नागरी विस्तार, सार्वजनिक उपयोगाच्या सुविधा, रस्ते व वाहतूक व्यवस्था, उद्याने व खुल्या जागा, सामाजिक व सांस्कृतिक सुविधा, प्रशासकीय इमारती तसेच शहराच्या - दीर्घकालीन विकास आराखड्यानुसार आवश्यक असलेल्या इतर सार्वजनिक प्रयोजनांसाठी करता येईल.
त्यामुळे बल्लारपूर शहराच्या सद्यस्थितीचा तसेच आगामी काळातील वाढती लोकसंख्या व नागरी गरजा यांचा सर्वंकष विचार करता, शासन जमा झालेली 19.43 हेक्टर जमीन नगर परिषद बल्लारपूरकडे हस्तांतरित करणे हे शहराच्या नियोजनबद्ध व शाश्वत विकासाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक व सार्वजनिक हिताचे आहे.
तरी, सदर 19.43 हेक्टर शासन जमा जमीन नगर परिषद बल्लारपूरकडे हस्तांतरित करण्याबाबत आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही करून शासन स्तरावर प्रस्ताव सादर करण्यास/मंजुरी मिळविण्यास मान्यता व मार्गदर्शन प्रदान करण्यात यावे, अशी मागनी जिल्हाधिकारी यांना करन्यात आली.









0 Comments