वरोरा येथे पिस्तूलसह आरोपी अटक; स्थानिक गुन्हे शाखा व वरोरा पोलिसांची संयुक्त कारवाई

 





वरोरा येथे पिस्तूलसह आरोपी अटक; स्थानिक गुन्हे शाखा व वरोरा पोलिसांची संयुक्त कारवाई


वरोरा,( Rajya Reporter News ) : वरोरा शहरात अवैधरित्या पिस्तूल बाळगणाऱ्या एका आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर व वरोरा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत अटक केली. या कारवाईत आरोपीकडून पिस्तूल व मॅगझीन असा सुमारे ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दिनांक १७ ऑगस्ट २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व वरोरा पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक वरोरा शहरात पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली की, संतोष दादाजी सेलोकर (वय ४८, रा. मित्र चौक, वरोरा) याने आपल्या राहत्या घरात अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगले आहे.

मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी संयुक्तपणे संतोष सेलोकर यांच्या राहत्या घरी छापा टाकला. घराची झडती घेतली असता एक पिस्तूल व मॅगझीन आढळून आले. पोलिसांनी हे अग्निशस्त्र जप्त केले असून त्याची अंदाजे किंमत ५०,००० रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

पोलिसांनी आरोपीकडे अग्निशस्त्राबाबत चौकशी केली असता, त्याने सदर पिस्तूल मित्र चौक, वरोरा येथील देवा नोकरकर यांच्याकडून आणल्याचे सांगितले. तसेच देवा नोकरकर यांच्या पत्नी सौ. भाग्यश्री देवा नोकरकर यांनी त्यांच्या राहत्या घरी सदर अग्निशस्त्र आणून दिल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले.

या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ९०४/२०२६, कलम ३ व २५ भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पिस्तूल पुरवठ्याशी संबंधित देवा नोकरकर व सौ. भाग्यश्री देवा नोकरकर यांचा पोलिसांकडून शोध सुरू असून पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक चंद्रपूर आयुष नोपाली, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल कातोरे आणि वरोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

कारवाईत स्थानिक गुन्हे शाखा व वरोरा पोलिसांचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.



Post a Comment

0 Comments