नांदगाव पोडे येथे बालसंरक्षण, आरोग्य व महिला सक्षमीकरण जनजागृती कार्यक्रम उत्साहात
बल्लारपूर,( Rajya Reporter News ) : जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय, चंद्रपूर तसेच पंचायत समिती बल्लारपूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय गोपाल वानखेडे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, नांदगाव पोड येथे बालसंरक्षण, आरोग्य व महिला सक्षमीकरण विषयक जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संवर्ग विकास अधिकारी धनंजय साळवे होते. प्रमुख उपस्थितीमध्ये केंद्रप्रमुख नागेंद्र कुंमरे, प्राथमिक आरोग्य केंद्र विसापूरच्या डॉ. अश्विनी कांबळे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. मांडवे, डॉ. तिपावी, ग्रामविकास अधिकारी विकास दुधे, विद्यालयाचे मुख्याध्यापक नरेंद्र बोबडे, रेल्वे चाइल्ड हेल्पलाइनच्या सुपरवायझर बबीता लोहकरे, केस वर्कर विजय अमर्थराज, ग्रामीण आरोग्य विभाग विसापूरच्या परिचारिका, शिक्षकवृंद व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांना गुड टच–बॅड टच, बालसंरक्षण, संकटाच्या प्रसंगी चाइल्ड हेल्पलाइन 1098 चा वापर, मोबाईलच्या अतिवापरामुळे होणारे मानसिक, शारीरिक व शैक्षणिक दुष्परिणाम, तसेच बालकांचे हक्क व संरक्षण याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी चाइल्ड हेल्पलाइनकडे येणाऱ्या संकटग्रस्त मुलांच्या उदाहरणांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली. तसेच बाल संगोपन योजना, अनाथ प्रमाणपत्र योजना आणि सखी वन स्टॉप सेंटर (181) विषयी माहिती देण्यात आली.
यावेळी डॉ. अश्विनी कांबळे यांनी गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षणासाठी उपलब्ध असलेल्या HPV लसीचे महत्त्व स्पष्ट केले. 14 ते 15 वर्षे वयोगटातील बालिकांनी ही लस आवर्जून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. लस घेतलेल्या बालिकांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच संबंधित बालिकांनी लसीबाबतचे सकारात्मक अनुभवही व्यक्त केले.
कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थी-विद्यार्थिनींची हिमोग्लोबिन (HB) रक्त तपासणी करण्यात आली. या जनजागृती कार्यक्रमात सुमारे 250 विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका सारिका कुचनकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन रोहिणी गुरुविले यांनी केले.








0 Comments