डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांचा विद्यार्थिनींना प्रेरणादायी वारसा; शिष्यवृत्तीधारकांचा उत्साहात गौरव
◾मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, बल्लारपूर
बल्लारपूर, ( Rajya Reporter News ) : मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, बल्लारपूर येथे भारताचे माजी राष्ट्रपती व 'मिसाईल मॅन' डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी डॉ. कलाम यांच्या प्रतिमेला विद्यालयाच्या प्राचार्या असमा खान यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
कार्यक्रमात शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या विद्यार्थिनींचा विशेष सत्कार करण्यात आला. इयत्ता चौथीतील सौम्या शिवानंद पेंदे, माही सुबोध कासोटे, श्रद्धा रवींद्र चिंतलवार, वैष्णवी विक्तूबाबा कामटकर तसेच इयत्ता सातवीतील मुस्कान इरफान शेख आणि आयुषी सुजित पुसाम या गुणवंत विद्यार्थिनींना पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. या यशस्वी विद्यार्थिनींचे उपस्थित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनींनी टाळ्यांच्या गजरात अभिनंदन केले.
यावेळी प्राचार्या असमा खान यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना सांगितले की, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे जीवन हे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी प्रेरणादायी आहे. मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम, सातत्य आणि आत्मविश्वास आवश्यक असून, शिक्षणाच्या बळावरच उज्ज्वल भविष्य घडविता येते. विद्यार्थिनींनी त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन जीवनात यशस्वी होण्याचा संकल्प करावा, असेही त्यांनी आवाहन केले.
कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या. प्रेरणादायी वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये शिक्षण, गुणवत्ता आणि राष्ट्रसेवेची नवी प्रेरणा निर्माण झाली.







0 Comments