भद्रावती येथील वनपाल व वनरक्षकांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
◾अवैध रेती वाहतूक प्रकरणातील कागदपत्रे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडे पाठविण्यासाठी २० हजारांची लाच मागितल्याचा आरोप
चंद्रपूर,( Rajya Reporter News ) : वनक्षेत्र सहाय्यक कार्यालय, भद्रावती येथील वनपाल श्री. कोमल नरसिंगराव घुगलोत व वनरक्षक श्री. संदीप पुंडलिक पारवे यांनी तक्रारदाराच्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर अवैधरित्या रेती भरून वाहतूक केल्याप्रकरणी केलेल्या कारवाईचे कागदपत्र वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याकडे पाठविण्यासाठी २० हजार रुपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूरच्या पथकाने कारवाई केली आहे.
दिनांक ०९/०७/२०२६ रोजी तक्रारदाराच्या घराच्या कामाकरिता त्यांच्या ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये रेती भरून वाहतूक करीत असताना रात्री ११.४५ वाजताच्या सुमारास आरोपी कोमल घुगलोत (वनपाल) व संदीप पारवे (वनरक्षक) यांनी ट्रॅक्टर ट्रॉली थांबवून ती वनक्षेत्र सहाय्यक कार्यालय, भद्रावती येथे घेऊन गेले.
तक्रारदाराच्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर अवैधरित्या रेती भरून वाहतूक केल्याबाबत करण्यात आलेल्या कारवाईचे कागदपत्र वनपरिक्षेत्र कार्यालय येथे पाठविण्याच्या कामाकरिता आरोपी कोमल नरसिंगराव घुगलोत, वय ४२ वर्षे, पद–वनपाल आणि आरोपी संदीप पुंडलिक पारवे, वय ३९ वर्षे, पद–वनरक्षक, दोन्ही वनक्षेत्र सहाय्यक कार्यालय, भद्रावती यांनी तक्रारदारास २० हजार रुपये लाचेची मागणी केली.
मात्र, तक्रारदारास दोन्ही आरोपींना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी दिनांक २३/०७/२०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कार्यालय चंद्रपूर येथे प्रत्यक्ष हजर येऊन तक्रार दिली.
तक्रारदाराच्या प्राप्त तक्रारीवरून दिनांक २७/०७/२०२६ रोजी आरोपी कोमल नरसिंगराव घुगलोत व आरोपी संदीप पुंडलिक पारवे या दोन्ही आरोपींची पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली. त्यावेळी त्यांनी तक्रारदाराच्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर अवैधरित्या रेती भरून वाहतूक केल्याप्रकरणी केलेल्या कारवाईचे कागदपत्र वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याकडे पाठविण्यासाठी २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून खासगी इसम श्री. ललित दिलीप नागपूरे, रा. भद्रावती, जि. चंद्रपूर यांच्यामार्फत स्वीकारल्याने तिन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास कार्य सुरू आहे.
सदरची कारवाई डॉ. दिगंबर प्रधान, पोलीस अधीक्षक व श्रीमती माधुरी बाविस्कर, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. या कारवाईत श्री. अनिल जिठवार, पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक प्रशांत केदार व सापळा पथकातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
दरम्यान, सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्या कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खासगी इसम (एजंट) यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी केली असल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.






0 Comments