बल्लारपूर विधानसभा क्षेत्राची आरोग्यसेवा महाराष्ट्रासाठी रोल मॉडेल ठरावी - आ. सुधीर मुनगंटीवार

 



बल्लारपूर विधानसभा क्षेत्राची आरोग्यसेवा महाराष्ट्रासाठी रोल मॉडेल ठरावी - आ. सुधीर मुनगंटीवार

◾२०२९ पर्यंतचा सर्वसमावेशक आरोग्य विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश; रिक्त पदे, आधुनिक सुविधा, डिजिटल आरोग्य व्यवस्थापनावर भर

चंद्रपूर,( Rajya Reporter News ) : बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील आरोग्य व्यवस्था महाराष्ट्रासाठी आदर्श ठरावी, या उद्देशाने सन २०२९ पर्यंतचा सर्वसमावेशक आरोग्य विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. चंद्रपूर येथील नियोजन भवन सभागृहात त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीच्या बैठकीत आरोग्य सेवांची गुणवत्ता वाढविणे, पायाभूत सुविधा मजबूत करणे, डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि डिजिटल आरोग्य व्यवस्थापन याबाबत सविस्तर नियोजन करण्यात आले.

आ. मुनगंटीवार यांनी सांगितले की, केवळ समित्या स्थापन करून थांबायचे नाही, तर त्यांची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी नियोजनबद्ध आणि परिणामकारक काम करणे आवश्यक आहे. पुढील तीन वर्षांत बल्लारपूरची आरोग्यवर्धिनी समिती महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट समिती म्हणून ओळखली जावी, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

आरोग्य केंद्रांमधील भौतिक सुविधा, आवश्यक बांधकामे, डॉक्टर व परिचारिकांसह कर्मचाऱ्यांची रिक्त पदे, औषध व्यवस्थापन, रुग्णालयातील स्वच्छता, सोनोग्राफी, ईसीजी, एमआरआय यांसारख्या आधुनिक वैद्यकीय सुविधांचे नियोजन, असंसर्गजन्य आजारांसाठी विशेष कृती आराखडा तसेच आरोग्य केंद्रांचा ग्रामीण रुग्णालये व वैद्यकीय महाविद्यालयाशी समन्वय यावर बैठकीत चर्चा झाली.

याशिवाय आरोग्य कर्मचाऱ्यांचे कौशल्यवर्धन, डिजिटल आरोग्य व्यवस्थापन प्रणाली, तक्रार निवारण यंत्रणा, कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेळेत मानधन, आरोग्य क्षेत्राचे मॅपिंग आणि स्थानिक युवक-युवतींना आरोग्य क्षेत्रासाठी प्रशिक्षण देण्याबाबतही निर्देश देण्यात आले.

ऑगस्टअखेर प्रस्तावित आरोग्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे सादरीकरण राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांसाठी आदर्श ठरेल, इतके दर्जेदार व माहितीपूर्ण असावे, असे निर्देशही आ. मुनगंटीवार यांनी दिले. यासाठी प्रत्येक आकडेवारी अद्ययावत, विश्लेषणात्मक आणि पुराव्यासह सादर करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

आरोग्य क्षेत्रासाठी आवश्यक निधी राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजना, जिल्हा नियोजन, सीएसआर, खनिज विकास निधी, आयुष मंत्रालय आदी माध्यमांतून उपलब्ध करून घेण्यासाठी माहिती संकलित करण्याचे निर्देश देण्यात आले. यावेळी आ. मुनगंटीवार यांनी मंत्री असताना खनिज विकास निधीतून ३२ प्राथमिक आरोग्य केंद्रांचे स्मार्ट पीएचसीमध्ये रूपांतर करण्यात आल्याची माहिती दिली.

समितीच्या कामकाजाचा नियमित आढावा घेण्यासाठी पुढील बैठक १३ ऑगस्ट २०२६ रोजी नियोजन भवन येथे घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

“निरोगी नागरिक हेच सक्षम राष्ट्राचे खरे सामर्थ्य आहे. लोकाभिमुख, गतिमान आणि सक्षम आरोग्य व्यवस्था उभारून बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाला राज्यातील आदर्श आरोग्य मॉडेल बनविण्यासाठी सर्वांनी समर्पित भावनेने काम करावे,” असे आवाहन आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.




Post a Comment

0 Comments