बल्लारशाह रेल्वे स्थानकावर प्रवासी सुविधांचा गळा घोटला जातोय; रेल्वे कायद्याच्या उल्लंघनावर ‘AAP’ पार्टी आक्रमक




बल्लारशाह रेल्वे स्थानकावर प्रवासी सुविधांचा गळा घोटला जातोय; रेल्वे कायद्याच्या उल्लंघनावर ‘AAP’ पार्टी आक्रमक

◾बल्लारशाह स्टेशनच्या बोर्डावरून ‘जंक्शन’ हा शब्द हटवण्यात आला 


बल्लारपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : बल्लारशाह मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकांना एक कडक पत्र लिहून आम आदमी पार्टीने बल्लारशाह जंक्शनची दुरवस्था आणि प्रवाशांवर होणाऱ्या अन्यायाबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे. रेल्वे प्रशासनाने आपल्या कार्यपद्धतीत सुधारणा करावी आणि प्रवाशांच्या कायदेशीर अधिकारांची पायमल्ली थांबवावी, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

वी.आय.पी. प्लॅटफॉर्मवर तासनतास मालगाड्या उभ्या केल्या जात असल्याने वृद्ध आणि दिव्यांगांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.  रेल्वे अधिनियम १९८९ मधील सुरक्षा मानकांचे थेट उल्लंघन आहे.  

कोणत्याही तांत्रिक कारणाशिवाय बल्लारशाह स्टेशनच्या बोर्डावरून ‘जंक्शन’ हा शब्द हटवणे ही स्थानिक अस्मितेशी केलेली थट्टा आहे. हा शब्द तत्काळ पुन्हा लावण्यात यावा, अशी मागणी ‘आप’ ने केली आहे. तसेच चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील हजारो तेलगू भाषिक नागरिकांची जीवनवाहिनी असलेली भाग्यनगरी व रामगिरी ट्रेन बंद ठेवणे हे जनहिताच्या विरुद्ध आहे.

‘अमृत भारत स्थानक’ योजना असूनही प्लॅटफॉर्मवर स्तनपान कक्ष आणि अचूक डिजिटल घड्याळांचा अभाव आहे. चंद्रपूरची भीषण उष्णता (४५°C+) लक्षात घेता प्रवाशांसाठी 'मिस्ट कूलिंग सिस्टम' बसवण्याची मागणीही करण्यात आली आहे. यासोबतच, स्थानिक नागरिकांना जी.आर.पी. (रेल्वे पोलीस) कडून झालेली मारहाण हा मानवी हक्कांचे उल्लंघन असून संबंधित दोषी कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी करण्याची मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.

लोह खनिज यार्डमधून उडणारी धूळ 'पर्यावरण संरक्षण कायद्या'च्या चिंधड्या उडवत असून, यामुळे स्थानिक शेती आणि नागरिकांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण झाला आहे. तसेच राणी लक्ष्मीबाई वॉर्डमधील ड्रेनेज व्यवस्थेच्या अपयशामुळे होणारे जलभराव हे रेल्वेच्या इंजिनीअरिंग विभागाच्या निष्काळजीपणाचा जिवंत पुरावा आहे.

रेल्वे हे केवळ नफा कमावण्याचे साधन नसून सार्वजनिक सेवेचे माध्यम आहे. बल्लारशाह सारख्या महत्त्वपूर्ण जंक्शनवर प्रवाशांना त्यांच्या मूलभूत अधिकारांपासून वंचित ठेवणे आता खपवून घेतले जाणार नाही. आम्ही प्रशासनाला सुधारण्याची संधी देत आहोत, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र भूमिका घ्यावी लागेल.




Post a Comment

0 Comments