माळी व अन्य समाजाच्या शिष्टमंडळांद्वारे चंद्रपुरातील बस स्टॅन्ड चौकात
◾महात्मा फुलेंचा पुर्णाकृती पुतळा उभारण्याची मनपा प्रशासनास मागणी
चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : दि. 26/07/1992 रोजी तत्कालीन नगर परिषद, चंद्रपूर नियोजन व विकास समिती सभेचा ठराव क्र. 12 व क्र. 13 नुसार चंद्रपूर येथील मुख्य बसस्थानक चौकास ‘‘महात्मा ज्योतिबा फुले चौक’’ असे नाव देऊन तेथे ‘‘महात्मा ज्योतिबा फुलेंचा पूर्णाकृती पुतळा’’ बसविने व जटपूरा गेट ते पोलीस मुख्यालयाकडे जाणाऱ्या मार्गास ‘‘महात्मा ज्योतिबा फुले मार्ग’’ हे नाव देण्याचा ठराव मंजूर करण्यात आलेला होता. मधल्या काळात माळी समाजाच्या वतीने सदर ठरावाची अंमलबजावणी करण्याबाबत पाठपुरावा करण्यात आला व त्यानुसार चैकाला महात्मा ज्योतिबा फुले हे नाव देऊन फलक उभारण्यात आला. परंतु पुतळा बसविण्याबाबत कोणतीही पाऊले तत्कालीन नगर परिषद व त्यानंतर अस्तित्वात आलेल्या महानगर पालिकेतर्फे उचलण्यात न आल्याने दि. 25 मार्च 2026 रोजी माळी व अन्य समाजाच्या वतीने महापौर संगीता खांडेकर, उप महापौर प्रशांत दानव व आयुक्त अकनुरी नरेश यांची भेट घेत सदर बाब निदर्शनास आणून देत महात्मा फुले चौकाचे सौंदर्यीकरण, महात्मा फुले यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याबाबत तात्काळ पावले उचलावी व येणाऱ्या 11 एप्रिल 2026 रोजी महात्मा फुले जयंती दिनी सदर कामास सुरुवात करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
‘‘क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे 11 एप्रिल 2026 ते 11 एप्रिल 2027 हे वर्ष द्विशताब्दी (200) जयंती वर्ष असून केंद्र व राज्य शासनाने हे वर्ष ‘‘महात्मा फुले द्विशताब्दी जयंती महोत्सव’’ म्हणून संपूर्ण भारतात भव्य स्वरूपात साजरा करण्याचे निश्चित केले आहे व त्यासाठी निधीची तरतूदही करण्यात आलेली आहे. या संपूर्ण वर्षभराच्या कालावधीत शिक्षण, सामाजिक समानता आणि महिला सक्षमीकरणावर आधारित विशेष कार्यक्रम शासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालयांमध्ये स्पर्धा आणि सांस्कृतिक उत्सवाच्या माध्यमातून आयोजित केले जाणार आहे.
‘‘क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले’’ दाम्पत्यांनी भारतीय शोषित, पीडित, गोरगरीब व सर्वसामान्य नागरिकांसाठी जनहिताचे केलेले कार्य कधीही न विसरणारे व त्यांनी केलेल्या जनसेवेची भावना नेहमीच सामान्य नागरिकांच्या हृदयात व आठवणीत जिवंत राहण्याकरिता उपरोक्त ठरावानुसार चंद्रपुरातील मुख्य बसस्थानक समोरील चौकात ‘‘क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले’’ यांचा पूर्णाकृती पुतळा महानगर पालिकेतर्फे उभारून या महामानवास खऱ्या अर्थाने अभिवादन करता येईल अशा भावना या वेळी शिष्टमंडळाने व्यक्त केल्या. यावेळी महापौर, उप महापौर व आयुक्त यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘‘महात्मा फुले द्विशताब्दी जयंती महोत्सव’’ चे औचित्य साधत पुढील वर्षी 11 एप्रिल 2027 रोजी महात्मा फुले चैकाचे सौंदर्यीकरण व पूर्णाकृती पुतळा उभारण्याचे काम पूर्ण करून चंद्रपूरच्या जनतेला ही अमूल्य भेट देत महात्मा फुल्यांना आदरांजली वाहू अशी ग्वाही दिली.
निवेदन देण्याकरीता प्रदीप पाटील, अनिल बनकर, डॉ. संजय घाटे, समता परिषदेचे नागपूर विभागीय अध्यक्ष, नगरसेविका सौ. शीतल गुरनुले, सौ. वैशाली महाडोळे, सौ. प्रतीक्षा येरगुडे, नगरसेवक पप्पू देशमुख, भालचंद्र दानव, विनोद लभाने, माजी नगरसेवक रवी गुरनुले, अजय महाडोळे, सचिन निंबाळकर, कुणाल चहारे, सुरेशजी कावळे, राजु साखरकर, विनोद राऊत, राहुल बनकर, योगेश निकोडे, विश्वास बनकर, राजेंद्र नागरकर, शिरीश वासेकर, रवी बनकर, अक्षय येरगुडे, मनोज वासेकर, अनिता बोढे इत्यादींची प्रामुख्याने उपस्थिती होती.






0 Comments