महाकाली यात्रा नियंत्रण कक्षाचे उद्घाटन
चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : चंद्रपूरचे आराध्य दैवत असलेल्या माता महाकाली यात्रेला सुरुवात झाली असून यात्रा कालावधीत राज्याबाहेरून तसेच जिल्ह्याबाहेरून मोठ्या प्रमाणात भाविकांची उपस्थिती अपेक्षित आहे. यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज असून भाविकांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या नियंत्रण कक्षाचे उद्घाटन महापौर सौ. संगीता खांडेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
महापौरांनी यात्रेच्या पार्श्वभूमीवर विविध सोयीसुविधांचा प्रत्यक्ष पाहणीद्वारे आढावा घेतला. यावेळी नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच पार्किंग व्यवस्था सुरळीत राहील व यात्रेकरूंना कोणतीही गैरसोय होणार नाही, याची विशेष दक्षता घेण्याचे निर्देश दिले.
सीसीटीव्ही यंत्रणेद्वारे सतत देखरेख ठेवण्यासाठी स्वतंत्र पथक नेमावे, प्रथमोपचार साहित्य मुबलक प्रमाणात उपलब्ध ठेवावे व आपत्कालीन पथक २४ तास सज्ज ठेवावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
यात्रेनिमित्त शहरात येणाऱ्या बसेससाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी तसेच प्रशासनाने निश्चित केलेल्या जागीच पार्किंग करण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले. भाविकांसाठी पिण्याचे पाणी, मोबाईल टॉयलेट, स्वच्छता व्यवस्था आदी मूलभूत सुविधा उपलब्ध ठेवण्यात याव्यात. स्वच्छता कर्मचारी शिफ्टनुसार कार्यरत राहतील याचीही दक्षता घेण्यास सांगण्यात आले.
नदी परिसरात आंघोळीदरम्यान कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी आपत्ती व्यवस्थापन पथक तैनात ठेवण्याचे तसेच आरोग्य विभागाने रुग्णवाहिका व आरोग्य पथक २४ तास उपलब्ध ठेवण्याचे निर्देश देण्यात आले.
यात्रेकरू महिलांसाठी ‘हिरकणी कक्ष’ यात्रा मैदानात (नियंत्रण कक्षाजवळ) उभारण्यात आला असून मदतीसाठी दूरध्वनी क्रमांकही जाहीर करण्यात आले आहेत. प्रशासनामार्फत उपलब्ध करून देण्यात आलेल्या सर्व सुविधांची माहिती पत्रकाद्वारे देण्यात आली असून ही पत्रके यात्रा परिसरातील सेवा केंद्रांवर उपलब्ध आहेत.
यावेळी उपमहापौर श्री. प्रशांत दानव, स्थायी समिती सभापती सौ. मनस्वी गिऱ्हे, मनपा आयुक्त श्री. अकुनुरी नरेश, प्रभागातील नगरसेवक तसेच मनपा अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.






0 Comments