चंद्रपूर जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यात पदभरती तसेच अद्ययावत सोयीसुविधा उपलब्ध करण्यात यावी- रघुवीर अहीर

 



चंद्रपूर जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यात पदभरती तसेच अद्ययावत सोयीसुविधा उपलब्ध करण्यात यावी- रघुवीर अहीर

◾पालकमंत्री डॉ. उईके यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर

चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : चंद्रपूर जिल्ह्यातील पशु चिकित्सालयामध्ये अनेक महत्वपुर्ण पदे रिक्त असून आवश्यक असलेला औषधीसाठा तसेच पशुंच्या उपचाराकरिता प्रभावी सोयी, सुविधा व अद्ययावत उपकरणे तसेच यंत्रसामुग्री उपलब्ध नसल्याने आजारी पाळीव जनावरांची तपासणी व तातडीचे औषधोपचार वेळेवर होत नसल्यामुळे पशुधन दगावण्याचे प्रमाण वाढले असून यामुळे पशुपालकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या संकटावर मात करण्यासाठी तसेच आजारी पाळीव प्राण्यांच्या जीवाचे संरक्षण होण्यासाठी राज्यशासनाने या जिल्ह्यातील जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय तसेच 15 तालुक्यातील पशुवैद्यकीय चिकित्सालय आणि ग्रामीण क्षेत्रातील सुमारे 156 पशुवैद्यकीय चिकित्सालयामध्ये प्रभावी उपचार यंत्रणा विकसित करून रिक्त असलेली सर्व पदे तातडीने भरण्याची मागणी भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष, युवा नेते रघुवीर अहीर यांनी दि. 28 मार्च रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोकजी उईके यांना निवेदन सादर करून केली आहे.

                स्थानिक एन.डी. हॉटेलमध्ये भाजप नगरसेवकांच्या संवाद कार्यक्रमात व्यासपीठावर पालकमंत्री मा.डॉ. अशोकजी उईके, आमदार मा. किशोरभाऊ जोरगेवार, महापौर मा.सौ. संगीताताई खांडेकर, गटनेता मा. शेखर शेट्टी, मा. तुषारजी सोम, नगरसेवक सुभाष कासनगोट्टुवार आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

                यावेळी पालकमंत्र्यांना सादर केलेल्या निवेदनाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे की, चंद्रपुर जिल्हा हा कृषीप्रधान असल्याने या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पशुपालक आहेत.दुग्ध व्यवसायातही हा जिल्हा आघाडीवर आहे. त्यामुळे शेती व्यवसायाकरिता बैल, रेडे तसेच दुग्ध व्यवसायाकरिता गायी, म्हशी, बकरी, मेंढ्या, आदी पाळीव प्राण्यांची संख्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहे. हजारो पशुपालक कुटुंबियांची उपजीविका या पशुधनावर अवलंबून आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पशुधनाचे संगोपन, संरक्षण व संवर्धन होण्याकरिता जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालयाच्या माध्यमातून निगा राखण्याची आवश्यकता असतांना या गंभीर प्रश्नाकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने पशुधनाच्या अस्तित्वावर विपरीत परिणाम होत आहे. पशुपालकांच्या तक्रारीनुसार आजारी असलेल्या पाळीव प्राण्यांवर पशु चिकित्सक व अन्य पदे रिक्त असल्याने वेळेवर उपचार होत नसून उपचाराअभावी पशु मृत्युमुखी पडण्याच्या घटना या जिल्ह्यात घडत असल्याचे पशुपालकांचे म्हणणे आहे.

                त्यामुळे तालुका स्तरावर असलेल्या जिल्ह्यातील 15 पशुवैद्यकीय चिकित्सालयांमध्ये तसेच ग्रामीण क्षेत्रात कार्यरत असलेल्या एकूण 156 पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये आवश्यक, प्रभावी व अद्ययावत उपचार यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणी रघुवीर अहीर यांनी केली आहे.

                आवश्यक औषधांची सुविधा, अत्याधुनिक उपकरणांची पुर्तता करून षासनाने बिमार व दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या जनावरांवर वेळेवर प्रभावी उपचार करण्याकरिता आवश्यक उपाययोजना करून पशुपालकांना न्याय द्यावा, त्यांच्या जनावरांचे रक्षण करावे तसेच राज्य सरकारने व पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाने चंद्रपूर जिल्ह्यातील पशुवैद्यकीय सेवेच्या सक्षमीकरणाकरिता चंद्रपुर जिल्हा आणि तालुका स्तरावरील पशुवैद्यकीय रुग्णालयांमध्ये शल्यक्रिया कक्ष (Operation Theatre), अतिदक्षता विभाग (ICU), पल्स ऑक्सिमीटर, क्ष-किरण (X-Ray), सोनोग्राफी, ऑक्सिजन सिलेंडर, अडॉप्टर, पशु रुग्णवाहिका, अॅनिमल लिफ्टींग मशीन, एक्झामिनेशन टेबल, लहान प्राण्यांसाठी विशेष औषधोपचार सुविधा यांसारख्या व अन्य अत्यावश्यक उपकरणांची उपलब्धता करण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.

                तसेच लॅब टेक्निशियन, पशुवैद्यकीय अधिकारी व अन्य संवर्गातील कर्मचारी यांची भरती तातडीने करून पशुवैद्यक यंत्रणा सक्षम करण्याची मागणी रघुवीर अहीर यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोकजी उईके यांना निवेदन सादर करून केली आहे. त्यांनी सदर मागणीचे निवेदन मा. मुख्यमंत्री व राज्याच्या पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्र्यांना सुध्दा पाठविले आहे. रघुवीर अहीर यांच्या नेतृत्वात पालकमंत्र्यांना भेटलेल्या शिष्टमंडळात मयुर भोकरे,  स्वप्निल डुकरे, रोहीत खेडेकर, प्रतिक शिवनकर, सुबोध चिकटे, ईश्वर वाघमारे आदींची उपस्थिती होती.




Post a Comment

0 Comments