APK ( एपीके ) लिंकद्वारे सायबर फसवणुक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा
◾सामाजिक कार्यकर्ते सचिन मंडल यांची मागणी
चंद्रपूर,( Rajya Reporter News ) : मोबाईलवर ए.पी.के. APK लिंक पाठवून बँक खाती रिकामी करणारी सायबर टोळी चंद्रपूर जिल्ह्यात कमालीची सक्रिय असून. या टोळीने अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. आपला व्हॉट्सॲप हॅक करून ब्रॅडकास्ट ग्रुप तयार करून तीन मित्रांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे अशा फसव्या लिंक आणि भामट्यांपासून सामान्य जनतेने अत्यंत सावध राहावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते सचिन मंडळ यांनी पत्रकार परिषदेत केले.
सचिन मंडळ यांनी माहिती देताना सांगितले की, ३० सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास व्हॉट्सॲपवर एका महिलेच्या नंबरवरून एक संदेश आला. त्या संदेशात आरटीओ टॅक्स चालान एपीके APK " अशी एक फाईल होती आणि खाली लिस्टमध्ये आपले नाव व पत्ता चेक करा असा मजकूर लिहिलेला होता.
शासकीय काम किंवा चालान असावे या समजुतीने मंडळ यांनी ती एपीके फाईल डाऊनलोड केली. ती लिंक डाऊनलोड होताच, अवघ्या साडेतीन तासांत म्हणजेच सायंकाळी ७:३० वाजता सचिन मंडळ यांचे व्हॉट्सॲप पूर्णपणे हॅक झाले.
मोबाईलचा ताबा मिळवताच सायबर भामट्यांनी मंडल यांच्या नंबरवरून २५६ लोकांचा एक ब्रॉडकास्ट ग्रुप तयार केला. या ग्रुपवर हॅकर्सनी तीच घातक 'APK एपीके लिंक' पाठवून मंडळ यांच्या संपर्कातील इतर लोकांनाही जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला. सचिन मंडळ यांच्या नंबरवरून मेसेज गेल्याने तीन मित्रांनी ती लिंक ओपन केली असता, त्यांच्या बँक खात्यातून रोकड सायबर चोरांनी लंपास केले. आपली आणि मित्रांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सचिन मंडळ यांनी तात्काळ रामनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन रीतसर तक्रार नोंदवली आहे.
पोलिसांनी हा गुन्हा सायबर सेलकडे वर्ग केला असून, सायबर तज्ज्ञांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. माझ्यासारखी इतर कोणत्याही निष्पाप आणि सामान्य नागरिकाची होऊ नये, याच सामाजिक भावनेतून मी पत्रकार परिषद घेऊन हा प्रकार समोर आणत आहे," असे मंडळ यांनी सांगितले.










0 Comments