नगर परिषद बल्लारपूरचा शिक्षक सन्मान सोहळा उत्साहात संपन्न

 





नगर परिषद बल्लारपूरचा शिक्षक सन्मान सोहळा उत्साहात संपन्न

◾शिक्षकांच्या कार्याचा गौरव; उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना ‘शिक्षकभूषण’ पुरस्काराने सन्मानित



बल्लारपूर ( Rajya Reporter News ) : शिक्षकांच्या योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बल्लारपूर नगर परिषदेच्या वतीने आयोजित शिक्षक सन्मान सोहळा रविवार, दि. ६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता राजे खांडक्या बल्लाळशाह नाट्यगृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बल्लारपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ. डॉ. अल्काताई वाढई होत्या. प्रमुख अतिथी म्हणून नगर परिषदेचे उपाध्यक्ष श्री. देवेंद्र आर्या, शिक्षण सभापती कु. प्रियंका भारत थुलकर, नियोजन सभापती श्री. पवन मेश्राम, महिला व बालकल्याण उपसभापती सौ. शिल्पा चुटे, नगरसेविका वैशाली हुमणे, सौ. अंकूबाई भुक्या, छाया मडावी, वैष्णवी जुमडे, मुख्याधिकारी श्री. विशाल वाघ, उपमुख्याधिकारी श्री. रविंद्र भंडारवार तसेच शैक्षणिक गुणवत्ता सल्लागार श्री. नागेश नीत यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. प्रास्ताविकातून उपमुख्याधिकारी श्री. रविंद्र भंडारवार यांनी कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट करत शिक्षकांचे समाज आणि विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत असलेले महत्त्व अधोरेखित केले.

यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हिंदी प्राथमिक शाळेतील इयत्ता चौथीची विद्यार्थिनी कु. रितिका ज्ञानसिंग सिंग हिने सन २०२६च्या शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल तिचा प्रशस्तीपत्र व नवोदय परीक्षेचे पुस्तक भेट देऊन गौरव करण्यात आला.

तसेच पी.एम. श्री. गांधी विद्यालयातील २५ विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय लाठी-काठी या पारंपरिक खेळात सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके पटकावल्याबद्दल त्यांना प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

शिक्षकांच्या योगदानाचा गौरव बल्लारपूर नगर परिषदेच्या पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील सर्व नियमित तसेच कंत्राटी शिक्षकांचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांनी केलेल्या योगदानाबद्दल यावेळी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

सन २०२५-२६ या शैक्षणिक सत्रात ‘प्रोजेक्ट अरुणोदय’ अंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा विशेष गौरव करण्यात आला. यामध्ये विजयालक्ष्मी पंडित प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. श्रीनिवास राईला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक शाळेचे शिक्षण सेवक श्री. बिनय बादल दत्ता तसेच कंत्राटी क्रीडा शिक्षक श्री. स्वप्नील गौतम डंभारे यांना ‘शिक्षकभूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रशस्तीपत्र, शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी श्री. पवन मेश्राम व कु. प्रियंका थुलकर यांनी मनोगत व्यक्त करून शिक्षकांना मार्गदर्शन केले. मुख्याधिकारी श्री. विशाल वाघ यांनी शिक्षकांच्या कार्याचे कौतुक करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

पवित्र पोर्टलच्या माध्यमातून नवनियुक्त शिक्षण सेविका कु. वृषाली यामावार यांना नियुक्तीपत्र प्रदान करून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

अध्यक्षीय भाषणात नगराध्यक्षा सौ. डॉ. अल्काताई वाढई यांनी शिक्षकांच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांच्या भवितव्याला आकार देण्यात शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. शिक्षक सन्मान सोहळ्याच्या माध्यमातून शिक्षकांच्या कार्याचा गौरव होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले व सर्व शिक्षकांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. किशोर डाखोरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. राजेंद्र गुडधे यांनी केले. उपस्थित मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी व नागरिकांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी बल्लारपूर नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी व शिपाई यांनी विशेष सहकार्य केले.



Post a Comment

0 Comments