राज्य शासनाची 'उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा' जाहीर; चंद्रपूर शहरातील गणेश मंडळांना सहभागाचे आवाहन!
◾राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांकासाठी ७.५ लाख रुपयांचे रोख बक्षीस
◾ganeshostav.pldmka.co.in वर ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
चंद्रपूर,( Rajya Reporter News ) : महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागातर्फे राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव हा 'राज्य महोत्सव' म्हणून साजरा केला जात असून, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या वतीने 'उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा' जाहीर करण्यात आली आहे. या स्पर्धेची व्याप्ती आता तालुका व जिल्हास्तरापासून ते राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत वाढविण्यात आली आहे. चंद्रपूर शहरातील नोंदणीकृत व परवानाधारक सार्वजनिक गणेश मंडळांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन चंद्रपुर मनपा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
स्पर्धेचे स्वरूप व पारितोषिके: या स्पर्धेत विविध स्तरांवर भरघोस रोख पारितोषिके व प्रमाणपत्रे देऊन मंडळांचा गौरव करण्यात येणार आहे.
राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तर:
प्रथम क्रमांक: रु. ७,५०,०००/-
द्वितीय क्रमांक: रु. ५,००,०००/-
तृतीय क्रमांक: रु. २,५०,०००/-
जिल्हा स्तर:
प्रथम क्रमांक: रु. ५०,०००/-
द्वितीय क्रमांक: रु. ४०,०००/-
तृतीय क्रमांक: रु. ३०,०००/-
तालुका स्तर:
प्रथम क्रमांक: रु. २५,०००/-
( तसेच जिल्हास्तरावरून राज्यस्तरासाठी शिफारस झालेल्या उर्वरित ३३ मंडळांना राज्य शासनातर्फे प्रत्येकी रु. ५०,०००/- देऊन गौरविण्यात येणार आहे. )
परीक्षणाचे १०० गुणांचे निकष -
स्पर्धेसाठी खालील ५ प्रमुख मुद्यांवर आधारित एकूण १०० गुणांचे परीक्षण केले जाईल:
कलांचे जतन व संवर्धन (२० गुण): गायन, वादन, नृत्य, नाट्य, पोवाडा, लावणी, झाडीपट्टी, शिल्पकला, मूर्तिकला, लुप्त होणाऱ्या कलांचे संवर्धन व सांस्कृतिक कार्यक्रम.
संस्कृतीचे जतन व संवर्धन (२० गुण): दुर्मिळ नाणी/शस्त्रे प्रदर्शन, कवी संमेलन, पुस्तक मेळा, वक्तृत्व/निबंध स्पर्धा, पारंपरिक व देशी खेळ, मंडळाचे ग्रंथालय इत्यादी.
निसर्गाचे व सार्वजनिक संपत्तीचे जतन (२० गुण): गडकिल्ले, वने, राज्य/राष्ट्रीय स्मारकांचे संवर्धन, पर्यटन व स्वच्छता जनजागृती उपक्रम.
सामाजिक कार्य (२० गुण): महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व वंचित घटकांसाठी उपक्रम, शासकीय योजनांचा प्रसार, आरोग्य, शिक्षण, अंधश्रद्धा निर्मूलन व समाजप्रबोधन.
गणेशोत्सव आयोजनातील विधायकता (२० गुण): पर्यावरणपूरक मूर्ती, इको-फ्रेंडली सजावट, प्रदूषणमुक्त परिसर, भाविकांसाठी प्राथमिक सोयी-सुविधा (पाणी, प्रथमोपचार), 'एक गाव एक गणपती' उपक्रम, तसेच मंडळाच्या कार्यकारिणीत किमान ३०% महिलांचा सहभाग.
सहभागासाठी प्रमुख अटी व नियम:
सदर स्पर्धेत केवळ संबंधित शासकीय यंत्रणेकडे नोंदणीकृत अथवा परवानाधारक सार्वजनिक गणेश मंडळेच पात्र राहतील.
मागील सलग दोन वर्षे राज्य किंवा जिल्हास्तरावर पारितोषिक मिळालेली मंडळे इतर मंडळांना संधी मिळावी म्हणून पारितोषिकासाठी पात्र ठरणार नाहीत.
मंडळाने केलेल्या कार्याचा कालावधी हा मागील वर्षाच्या अनंत चतुर्दशीपासून चालू वर्षाच्या अनंत चतुर्दशीपर्यंत ग्राह्य धरला जाईल.
अर्ज कसा करावा?
पात्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या ganeshostav.pldmka.co.in या अधिकृत पोर्टलवर जाऊन विहित मुदतीत आपला ऑनलाईन अर्ज सादर करावयाचा आहे.
चंद्रपूर शहरातील जास्तीत जास्त गणेश मंडळांनी विधायक व पर्यावरणपूरक उपक्रम राबवून या राज्य महोत्सवांतर्गत आयोजित स्पर्धेत सहभाग घ्यावा आणि शहराचा नावलौकिक वाढवावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.







0 Comments