ओबीसी महासंघाचे 7ऑगस्टला बंगळुरू येथे महाअधिवेशन
◾ओबीसींची जातिनिहाय जनगणना राहणार प्रमुख मुद्दा
◾नागपुरात बैठक सपन्न.
चंद्रपूर,( Rajya Reporter News ) : राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व सभासदांची महत्त्वपूर्ण कार्यकारिणी व संघटनात्मक आढावा बैठक रविवारी, दि. ५ जुलै २०२६ रोजी नागपूर येथील पावनभूमी परिसरात राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांच्या निवासस्थानी उत्साहात पार पडली. या बैठकीत येत्या ७ ऑगस्ट २०२६ रोजी बंगळुरू (कर्नाटक) येथे होणाऱ्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या ११ व्या राष्ट्रीय महाअधिवेशनाच्या तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
डॉ. बबनराव तायवाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत महाअधिवेशनाचे नियोजन, उपस्थिती वाढविण्यासाठीचे प्रयत्न, प्रचार-प्रसार, संघटनात्मक जबाबदाऱ्या, स्थानिक समन्वय तसेच महासंघाच्या विविध प्रलंबित विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. ज्ञान ज्योती सभागृह, डॉ. मनमोहन सिंग बंगळुरू सिटी युनिव्हर्सिटी, क्रांतिवीर संगोळी रायन्ना रेल्वे स्टेशन सिटी मॅजेस्टिक परिसर येथे हे महाअधिवेशन होणार असल्याची माहिती बैठकीत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजुरकर यांनी दिली आली. या वेळी बेंगळूर येथे होणाऱ्या 11 व्या महादिवेशनाचे पोस्टर रिलीज करण्यात आले बैठकीदरम्यान बंगळुरू महाअधिवेशन भव्य, शिस्तबद्ध आणि ऐतिहासिक करण्याचा निर्धार पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. ओबीसी समाजाची जातिनिहाय जनगणना हा विषय प्रामुख्याने अधिवेशनात चर्चिला जाईल तसेच समाजाच्या प्रश्नांवर अधिक संघटित, ठाम आणि व्यापक भूमिका घेण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली. तसेच महासंघाची संघटनात्मक बळकटी वाढविणे, विविध विभागनिहाय जबाबदाऱ्या निश्चित करणे आणि राज्यनिहाय समन्वय अधिक प्रभावी करण्यावर भर देण्यात आला.
यावेळी महासंघाच्या संघटनात्मक विस्ताराच्या दृष्टीने काही महत्त्वपूर्ण नियुक्त्याही जाहीर करण्यात आल्या. राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी रत्नमाला पिसे यांची, तर महाराष्ट्र युवा महासंघाच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी सुरज बेलोकर यांची निवड करण्यात आली. या निवडीमुळे महासंघाच्या महिला व युवा आघाडीला नवे बळ मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. बैठकीस राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे शरद वानखेडे, गुणेश्वर आरिकर, खुशाल शेंडे,रामदास कामडी, श्रीहरी सातपुते,परमेश्वर राऊत, गणेश चौकसे, राहुल करगळे, आशिष तायवाडे,निलेश खोडे, प्रा. गोसाई सर, शकील पटेल, भवनाताई बावनकर, ममताताई डुकरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या आढावा बैठकीमुळे बंगळुरू येथे होणाऱ्या राष्ट्रीय महाअधिवेशनाच्या तयारीला नवी गती मिळाली असून महासंघाच्या पुढील वाटचालीसाठीही ही बैठक महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.







0 Comments