IIT तिरुपती येथे NPTEL समर इंटर्नशिपसाठी आरसीईआरटीच्या विद्यार्थिनी प्रणोती मुंजणकरची निवड
चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : सरदार पटेल मेमोरियल सोसायटी (ट्रस्ट), चंद्रपूर द्वारा संचालित राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, रिसर्च अँड टेक्नॉलॉजी (आरसीईआरटी), चंद्रपूरच्या संगणक विज्ञान व अभियांत्रिकी (CSE) विभागातील विद्यार्थिनी प्रणोती अशोक मुंजणकर हिची प्रतिष्ठित NPTEL Summer Internship Program 2026 साठी निवड झाली आहे. ही इंटर्नशिप IIT तिरुपती येथे प्रा. ईशापथिक दास यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष (In-Person) स्वरूपात पार पडणार आहे.
या इंटर्नशिपचा कालावधी १२ आठवड्यांचा (३ महिने) असून विद्यार्थिनीला ₹15,000 प्रतिमाह स्टायपेंड प्रदान करण्यात येणार आहे. इंटर्नशिपदरम्यान प्रणोती बिग डेटा कॉम्प्युटिंग या अत्याधुनिक आणि संशोधनाधिष्ठित विषयावर कार्य करणार आहे.
NPTEL ही भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयांतर्गत भारतीय तंत्रज्ञान संस्था (IITs) आणि भारतीय विज्ञान संस्था (IISc) यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणारी राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक योजना आहे. या योजनेअंतर्गत देशभरातील गुणवंत विद्यार्थ्यांमधून अत्यंत स्पर्धात्मक प्रक्रियेद्वारे इंटर्नची निवड केली जाते. अशा प्रतिष्ठित कार्यक्रमासाठी प्रणोतीची झालेली निवड ही महाविद्यालयासाठी अभिमानास्पद बाब मानली जात आहे.
विद्यार्थिनीच्या या यशाबद्दल अभिनंदन करताना संगणक विज्ञान व अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. नितीन जानवे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण परिश्रम, संशोधनाची आवड आणि तांत्रिक कौशल्यांच्या बळावर राष्ट्रीय स्तरावरील संधींचा लाभ घ्यावा. प्रणोतीचे हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
स्वयं-एनपीटीईएल समन्वयक (SPOC) डॉ. वनिता बुरडकर यांनी सांगितले की, आरसीईआरटीमध्ये विद्यार्थ्यांना NPTEL अभ्यासक्रम, ऑनलाइन प्रमाणपत्र परीक्षा, संशोधनाभिमुख उपक्रम तसेच राष्ट्रीय स्तरावरील इंटर्नशिपच्या संधींबाबत सातत्याने मार्गदर्शन केले जाते. संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वातावरणामुळे आणि प्राध्यापकांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना अशा प्रतिष्ठित संधी प्राप्त होत असून भविष्यातही अधिकाधिक विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर यश संपादन करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल झेड. चिताडे, विभागातील प्राध्यापकवृंद तसेच विद्यार्थ्यांनी प्रणोती अशोक मुंजणकर हिचे अभिनंदन करून तिच्या भावी शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
या उल्लेखनीय यशामुळे आरसीईआरटीच्या शैक्षणिक गुणवत्तेचा आणि विद्यार्थ्यांमधील संशोधनाभिमुखतेचा पुन्हा एकदा प्रत्यय आला असून महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर पडली आहे.






0 Comments