नारीशक्तीचा सन्मान म्हणजे समाजाच्या सामर्थ्याचा गौरव - आ. किशोर जोरगेवार
◾पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त ‘ज्येष्ठ नारीशक्ती सत्कार सन्मान सोहळा’ उत्साहात संपन्न
चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, चंद्रपूर जिल्हा महानगर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला “ज्येष्ठ नारीशक्ती सत्कार सन्मान सोहळा” उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणार्या ज्येष्ठ महिलांचा यावेळी शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
गांधी चौक येथील भारतीय जनता पार्टी महानगर जनसंपर्क कार्यालयात आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार किशोर जोरगेवार होते.
यावेळी माजी महापौर, नागपूर तथा चंद्रपूर जिल्हा महानगर प्रभारी व प्रदेश सचिव अर्चना डेहनकर, माजी अध्यक्षा समाज कल्याण महामंडळ शोभाताई पोटदुखे, ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्या विद्याताई बांगडे, सन्मित्र महिला नागरी सहकारी बँकेच्या अध्यक्षा डॉ. रजनी हजारे, माजी महापौर अंजली घोटेकर, ज्येष्ठ नेत्या हेमलता पाजणकर, माजी नगराध्यक्षा बिता रामटेके तसेच माजी नगराध्यक्षा सुनीताताई लोठिया, महामंत्री सविता दंढारे, नगर सेविका सविता कांबळे, नगर सेविका शितल गुरुनुले, सरला कुळसंगे, पूष्पा उराडे, आशा देशमूख, अॅड. सारिका संदुरकर, ज्योती जिवणे, सहिदा शेख, महामंत्री सायली तोंडरे, विमल कातकर, मिना मोरपाका, ज्योती जिवणे आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी सांगितले कि, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या केवळ एक आदर्श शासक नव्हत्या, तर लोककल्याणासाठी आयुष्य वेचणार्या महान समाजसुधारक होत्या. त्यांनी महिलांना नेतृत्व, न्याय आणि लोकसेवेचा आदर्श दिला. आजच्या महिला प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असून समाजाच्या प्रगतीत त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. ज्येष्ठ महिलांच्या कार्याचा सन्मान करणे म्हणजे त्यांच्या संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवासाला अभिवादन करणे होय. अशा कार्यक्रमांमुळे नव्या पिढीतील महिलांना समाजकारण आणि राष्ट्रकार्यात सहभागी होण्याची प्रेरणा मिळते, असे त्या म्हणाल्या.
तर यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले कि, महिलांचे कर्तृत्व म्हणजे समाजाच्या विकासाचा मजबूत पाया आहे. समाजाच्या जडणघडणीत महिलांचे योगदान अमूल्य आहे. कुटुंब, समाज, शिक्षण, प्रशासन, राजकारण आणि विविध क्षेत्रांत महिलांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. त्यांच्या कार्याचा गौरव करणे हीच त्यांच्याप्रती खरी कृतज्ञता आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आदर्श प्रशासन आणि लोककल्याणाचे कार्य करून इतिहासात अजरामर स्थान निर्माण केले. त्यांचे जीवन आजही प्रत्येक महिलेसाठी प्रेरणादायी आहे. महिलांना योग्य संधी, शिक्षण आणि प्रोत्साहन मिळाल्यास त्या कोणतेही ध्येय साध्य करू शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जोरगेवार पुढे म्हणाले की, आज आपण ज्या ज्येष्ठ नारीशक्तीचा सन्मान करीत आहोत, त्यांनी आपल्या कार्यातून समाजाला दिशा दिली आहे. त्यांच्या अनुभवातून आणि कार्यातून नव्या पिढीला प्रेरणा मिळत राहील. नारीशक्तीचा गौरव म्हणजे समाजाच्या सामर्थ्याचा सन्मान असून महिलांच्या सहभागाशिवाय विकसित समाज आणि विकसित राष्ट्राची कल्पना पूर्ण होऊ शकत नाही असे ते म्हणाले.
या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणार्या ज्येष्ठ महिला भगिनींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या पदाधिकार्यांसह विविध क्षेत्रांतील महिला, कार्यकर्त्या व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
* स्वावलंबी महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार - आ. किशोर जोरगेवार
* अम्मा की दुकान’ उपक्रमातून कष्टाळू उद्योजिकेला दिलासा, नुपूर तापाली यांना आमदार यांचा मदतीचा हात
जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या बळावर स्वतःचा व्यवसाय उभारून आर्थिक स्वावलंबनाचा आदर्श निर्माण करणाऱ्या कुमारी नुपूर तापाली यांना आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते ‘अम्मा की दुकान’ या उपक्रमांतर्गत नवीन स्थायी स्वरूपाचा ठेला प्रदान करण्यात आला. हा कार्यक्रम भारतीय जनता पक्षाच्या महानगर जनसंपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आला होता.
यावेळी माजी मंत्री शोभाताई फडणवीस, भाजप चंद्रपूर महानगर प्रभारी अर्चनाताई डेहनकर, भारतीय जनता पक्षाचे माजी महानगराध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, माजी महापौर अंजली घोटेकर, महामंत्री रविंद्र गुरुनुले, सविता दंढारे, नगरसेविका सविता कांबळे, सरला कुळसंगे, विद्या बांगडे, राम जंगम, रामकुमार आक्कापल्लीवार, निलिमा वनकर, शालू कन्नोजवार आदींची उपस्थिती होती.
कुमारी नुपूर तापाली या अत्यंत कमी वयात स्वतःचा व्यवसाय यशस्वीपणे सांभाळत असून आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारीही समर्थपणे पार पाडत आहेत. त्यांच्या कष्टाळूपणाची आणि संघर्षमय प्रवासाची दखल घेत आमदार किशोर जोरगेवार यांनी त्यांच्या व्यवसायासाठी आवश्यक सुविधांची पाहणी केली होती.
व्यवसायासाठी वापरला जाणारा ठेला अस्थायी स्वरूपाचा असल्याने त्याची दररोज ने-आण करताना नुपूर यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. ही समस्या लक्षात घेऊन त्यांना व्यवसाय अधिक सुलभपणे करता यावा आणि त्यांच्या रोजगाराला स्थैर्य मिळावे, या उद्देशाने नवीन स्थायी स्वरूपाचा ठेला उपलब्ध करून देण्यात आला.
यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, कुमारी नुपूर तापाली यांच्यासारख्या धाडसी आणि मेहनती उद्योजिका समाजासाठी प्रेरणादायी आहेत. अत्यंत कमी वयात त्यांनी स्वबळावर व्यवसाय उभारून आत्मनिर्भरतेचा आदर्श निर्माण केला आहे. अशा कष्टाळू महिलांच्या पाठीशी उभे राहणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. कष्ट, जिद्द आणि प्रामाणिकपणाच्या बळावर स्वतःचे भविष्य घडविणाऱ्या उद्योजकांना प्रोत्साहन देणे ही काळाची गरज आहे.
ते पुढे म्हणाले की, महिलांचे आर्थिक सक्षमीकरण हे समाजाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. अशा उद्योजकांना आवश्यक ते सहकार्य मिळाल्यास त्या केवळ स्वतःच नव्हे, तर अनेकांसाठी रोजगार आणि प्रेरणा निर्माण करू शकतात. भविष्यातही अशा कष्टाळू उद्योजकांसाठी शक्य ती सर्व मदत करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असे त्यांनी सांगितले.








0 Comments