बल्लारपूर शहरात जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड

 




बल्लारपूर शहरात जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड 

◾सहा जण ताब्यात, ४४ हजारांचा मुद्देमाल जप्त

बल्लारपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : शहरातील रविंद्रनगर परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर बल्लारपुर पोलिसांनी धाड टाकून सहा जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम व मोबाईलसह एकूण ४४ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी ३१ मार्च रोजी दुपारी करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार बल्लारपूर पोलीस स्टेशन चे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व कर्मचारी यांना पेट्रोलिंगदरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीनुसार रविंद्रनगर येथील प्रभाकर पाटील यांच्या घरासमोरील अंगणात छापा टाकला. तेथे काही इसम गोलाकार बसून ५२ पत्त्यांवर पैशांची बाजी लावून जुगार खेळत असल्याचे आढळून आले.

पोलिसांनी तात्काळ परिसराला घेराव घालून आरोपींना पकडले. पकडण्यात आलेल्या आरोपींमध्ये प्रभाकर पाटील (६७), विजय खंडेलवाल (६२), संजय मलय्या डोणीवार (५१), विठ्ठल नगराळे (५५) आणि प्रल्हाद भाटु राठोड (६६) व अन्य एकाचा समावेश आहे. सर्व आरोपी बल्लारपूर शहरातील विविध भागातील रहिवासी आहेत.

कारवाईदरम्यान आरोपींच्या अंगझडतीत रोख रक्कम तसेच विविध कंपन्यांचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले. तसेच जुगार खेळण्यासाठी वापरलेले ५२ पत्ते व डावावरील रोख रक्कमही पोलिसांनी ताब्यात घेतली.

सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२(अ) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अभिषेक जंगमवार, पोहवा संतोष पंडीत, सत्यवान कोटनाके, विकास जुमनाके, पो अं शरदचंद्र कारूष यांनी केले. पुढील तपास बल्लारशाह पोलीस करत आहेत.




Post a Comment

0 Comments