प्लास्टिक कचरा व्यवस्थापन व चक्रीय अर्थव्यवस्थेवर परिसंवाद
चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : केंद्रीय पेट्रोरसायन अभियांत्रिकी व प्रोद्योगिकी संस्थान (CIPET), चंद्रपूर यांच्या वतीने “प्लास्टिक कचरा व्यवस्थापन व चक्रीय अर्थव्यवस्था” या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिसंवाद उत्साहात व यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आला. प्लास्टिकचा योग्य वापर, कचरा निर्मिती कमी करणे, पुनर्वापर वाढविणे आणि पर्यावरण संरक्षणाबाबत व्यापक जनजागृती करणे हा या परिसंवादाचा प्रमुख उद्देश होता.
परिसंवादाचे उद्घाटन माजी केंद्रीय राज्यमंत्री (रसायने व खते मंत्रालय) हंसराज अहीर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी उद्योग संघाचे अध्यक्ष मधुसुदन रुंगटा प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. उद्घाटनपर भाषणात श्री. अहीर यांनी पर्यावरण संरक्षणासाठी प्लास्टिक कचऱ्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन व आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन केले.
परिसंवादात विविध क्षेत्रातील तज्ञांनी मार्गदर्शन केले. डॉ. गुरनुले (प्राध्यापक, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ), डॉ. सत्यम मिश्रा (प्रकल्प वैज्ञानिक, निरी नागपूर) तसेच डॉ. विजयाकुमार (सह प्राध्यापक, व्हीएनआयटी नागपूर) यांनी प्लास्टिक पुनर्वापर तंत्रज्ञान, कचरा वर्गीकरण पद्धती, अत्याधुनिक प्रक्रिया तंत्रे आणि चक्रीय अर्थव्यवस्थेची संकल्पना यावर सविस्तर मार्गदर्शन केले.
या परिसंवादास सिपेट चंद्रपूरचे संचालक व प्रमुख प्रवीण बच्छाव यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी प्लास्टिकचा जबाबदारीने वापर करण्याबरोबरच प्लास्टिक कचरा व्यवस्थापन क्षेत्रात उद्योजकतेच्या संधी उपलब्ध असल्याचे नमूद केले व युवकांनी या क्षेत्रात पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. वरिष्ठ तांत्रिक अधिकारी देवानंद बाबोले यांनीही तांत्रिक बाबींवर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास विद्यार्थी, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी तसेच विविध संस्थांचे सहभागी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






0 Comments