व्यसनमुक्तीचा संकल्प; विद्यार्थ्यांना निरोगी जीवनाचा संदेश

 





व्यसनमुक्तीचा संकल्प; विद्यार्थ्यांना निरोगी जीवनाचा संदेश

◾मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालयात ‘व्यसनमुक्ती जनजागृती अभियान’; मिशन स्पंदन व ब्रह्मकुमारीजचा संयुक्त उपक्रम


बल्लारपूर,( Rajya Reporter News ) : मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, बल्लारपूर येथे मिशन स्पंदन व ब्रह्मकुमारीज, बल्लारपूर यांच्या संयुक्त विद्यमाने व्यसनमुक्ती जनजागृती अभियान उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये व्यसनांविषयी जागरूकता निर्माण करून निरोगी व सुदृढ जीवनशैलीचा संदेश देणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश होता.

कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या बी.के. स्मिता दीदी आणि बी.के. विनोद भाईजी यांनी विद्यार्थ्यांना तंबाखू, गुटखा, सिगारेट, मद्यपान तसेच विविध अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या शारीरिक, मानसिक व सामाजिक दुष्परिणामांची माहिती अगदी सोप्या व प्रभावी भाषेत दिली.

व्यसनाची सुरुवात अनेकदा छोट्या सवयीपासून होते आणि पुढे त्याचे गंभीर परिणाम व्यक्ती, कुटुंब व समाजावर होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारच्या व्यसनापासून स्वतःला दूर ठेवावे, तसेच आपल्या कुटुंबीयांमध्ये आणि समाजातही व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचवावा, असे आवाहन प्रमुख वक्त्यांनी केले.


चारित्र्य आणि संस्कृती जपण्याचे आवाहन


शाळेच्या मुख्याध्यापिका असमा खान मॅडम यांनी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त जीवनासोबतच चांगले चारित्र्य, संस्कृती, संस्कार आणि सकारात्मक विचार यांचे महत्त्व पटवून दिले. विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात चांगल्या सवयी अंगीकारून समाजासाठी आदर्श निर्माण करावा, असे त्यांनी सांगितले.

यावेळी कार्यक्रमाला बी.के. स्मिता दीदी, बी.के. विनोद भाईजी, बी.के. डॉ. क्षमा बहन तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका असमा खान मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन वंदना किसान मॅडम यांनी केले. या जनजागृती अभियानास विद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांचा व्यसनमुक्तीचा संकल्प

या अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये व्यसनांविरोधात जागरूकता निर्माण झाली असून, ‘व्यसनापासून दूर राहू, निरोगी जीवन जगू आणि समाजालाही व्यसनमुक्तीचा संदेश देऊ’ असा सकारात्मक संदेश कार्यक्रमातून देण्यात आला.




Post a Comment

0 Comments