बल्लारपूर शहरात देशी बनावटीची पिस्टल व जिवंत काडतुसे जप्त
◾एक आरोपी ताब्यात,एक फरार
बल्लारपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : बल्लारपूर शहरात भगतसिंग वार्ड परिसरात अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगून फिरणाऱ्या दोन तरुणांविरुद्ध बल्लारपूर पोलिसांनी कारवाई करत देशी बनावटीची पिस्टल व जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या प्रकरणात एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून दुसरा आरोपी फरार झाला आहे. सदर कारवाई रविवार, ८ मार्च रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास केली.
बल्लारपूर पोलीस स्टेशन चे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व कर्मचारी ८ मार्च रोजी रात्री पेट्रोलिंग करीत असताना गुप्त माहिती मिळाली की भगतसिंग वार्ड परिसरातील आरोपी कार्तीक उर्फ यश राकेश निषाद (वय १९) व मोनु मंजा निषाद हे दोघे अवैधरित्या अग्निशस्त्र जवळ बाळगून फिरत आहेत.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी भगतसिंग चौक परिसरात छापा टाकला. त्यावेळी संशयास्पद हालचाल करणाऱ्या दोन युवकांना पाहताच एक जण पळून गेला, तर दुसऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या युवकाने आपले नाव कार्तीक उर्फ यश राकेश निषाद असे सांगितले असून त्याच्यासोबत असलेला मोनु मंजा निषाद हा पोलिसांना पाहताच फरार झाल्याचे समोर आले.
पोलिसांनी चौकशी केल्यानंतर फरार आरोपी मोनु निषाद याच्या काकुचा घरी शोध घेतला. घराची झडती घेतली असता छताच्या वासावर पिवळ्या कापडात गुंडाळून ठेवलेली देशी बनावटीची ७.६५ मिमी बोरची पिस्टल व तीन जिवंत काडतुसे आढळून आली. हा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याची एकूण किंमत सुमारे २३ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी आरोपी कार्तीक उर्फ यश राकेश निषाद व मोनु मंजा निषाद दोन्ही रा. भगतसिंग वार्ड, बल्लारपूर यांच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायद्यान्वये कलम ३, २५ तसेच कलम ३(५) अन्वये बल्लारपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फरार आरोपीचा शोध सुरू असून पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहे.
सदर कारवाई पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अभिषेक जंगमवार, पोहवा संतोष पंडीत, संतोष दंडेवार, सत्यवान कोटनाके, प्रविण निकोडे, मोहनलाल निषाद, पंकज शिंदे, नापोअं सचिन अल्लेवार, पोअं खंडेराव माने, लखन चव्हाण, मिलिंद आत्राम, गुरू शिंदे, वैभव गाडगे, मपोअं रुपाली माथनकर यांनी केले.







0 Comments