मरणानंतरही यातना संपेना ! पुलाअभावी अंतिम संस्कारासाठी पुरातून न्यावा लागला मृतदेह !
सोलापूर ( राज्य रिपोर्टर ) : सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अक्कलकोट तालुक्यातील पितापूर गावात पूल नसल्यामुळे पुराच्या पाण्यातून ग्रामस्थांना अंतयात्रा काढावी लागली आहे. देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या गाजावाजात साजरा होत आहे. विकासाच्या नावाने डंके पिटले जात असतानाच एकीकडे असे उदाहरण समोर आल्याने मरणानंतरही यातना संपल्या नाहीत, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात अक्कलकोट तालुक्यातील पितापूर गावाजवळून जाणाऱ्या हरणा नदीतील विदारक दृश्य समोर आले आहे. अक्कलकोट तालुक्यातील पितापूर गावाची स्मशानभूमी हरणा नदीच्या पलीकडे आहे.
मात्र, नदीला पूर आला होता. आणि पूल नसल्यामुळे ग्रामस्थांनी थेट नदीच्या पाण्यातून अंत्ययात्रा नेऊन मृतदेहावर अंत्यसंस्कार केला. हरणा नदीवर पूल नसल्याने नागरिकांना अंत्यविधीसाठी अशा प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागला. मरणानंतरही खडतर प्रवास करण्याची वेळ आल्याचा प्रकार समोर आला आहे.
नदीच्या पाण्यातून अंत्ययात्रा घेऊन जातानाची मनाला चटका देणारी घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दरम्यान, हरणा नदीवर पूल बांधण्यात यावा, यासाठी अनेक वर्षांपासून या पुलासंदर्भात ग्रामस्थांनी मागणी केली आहे. मात्र, तरीसुद्धा प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. आता मृतदेह पाण्यात घेऊन जाण्याची वेळ आली, त्यामुळे आतातरी पूल बांधण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे.







0 Comments