चंद्रपूर शहरातील जड वाहनांची प्रवेशबंदी आता सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत लागू राहणार
◾चंद्रपूर शहरातील जड वाहनांच्या प्रवेशबंदीच्या वेळेत बदल
◾सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत जड वाहनांना प्रवेशबंदी
◾जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक आणि स्कूल बसेससाठी विशेष शिथिलता
चंद्रपूर,( Rajya Reporter News ) : शहरातील वाढती वाहनसंख्या, वाहतुकीची कोंडी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून चंद्रपूर शहरातील जड वाहनांच्या प्रवेशबंदीच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत जड वाहनांना शहरातील संबंधित मार्गांवर प्रवेशबंदी राहणार आहे.
यासंदर्भात पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी पूर्वीच्या आदेशात अंशतः बदल करून अधिसूचना (शुद्धिपत्रक) निर्गमित करण्याचे ठरविले आहे.
यापूर्वी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या दि. २५ सप्टेंबर २०१२ रोजीच्या अधिसूचनेनुसार मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ च्या कलम ३३ (ब) अंतर्गत प्रियदर्शनी चौक ते चंद्रपूर शहरातील परकोटाच्या आतील भागातील सर्व मार्गांवर मालवाहू ट्रक व इतर जड वाहनांना (एस.टी. बसेस वगळून) सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत प्रवेशबंदी लागू करण्यात आली होती.
मात्र, शहरातील वाहनांची संख्या वाढल्यामुळे निर्माण होणारी वाहतूक समस्या, रहदारीतील अडथळे आणि नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन व्यवस्थेत आवश्यक बदल करण्याची गरज निर्माण झाली आहे. वाहतूक सुरळीत ठेवण्याबरोबरच अपघातामुळे जीवित अथवा वित्तहानी होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.
जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीचा विचार
शहरातील नागरिकांसाठी पेट्रोल, डिझेल व केरोसिन यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणारी जड वाहने वेळेवर पोहोचणे आवश्यक आहे. या बाबीचाही नव्या वाहतूक नियोजनात विचार करण्यात आला आहे.
स्कूल बसेससाठी निश्चित मार्ग
चंद्रपूर शहराच्या परकोटाच्या आतील भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या स्कूल बसेसना विशेष शिथिलता देण्यात येणार आहे. मात्र या बसेसना परकोटाच्या आतील सर्व मार्गांवरून मुक्तपणे प्रवेश करता येणार नाही. स्कूल बसेसना जटपुरा गेटमार्गे कस्तुरबा रोडने प्रवेश करून मराठी सिटी शाळेजवळ विद्यार्थ्यांना सोडता अथवा घेता येईल. त्यानंतर गिरनार चौक – अंचलेश्वर गेट – राजीव गांधी इंजिनिअरिंग कॉलेजमार्गे बायपास रोडने बाहेर जावे लागेल. तसेच या स्कूल बसेस शहरातील कोणत्याही रस्त्यावर उभ्या करता येणार नाहीत.
पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी प्राप्त कायदेशीर अधिकारांचा वापर करून दि. २५ सप्टेंबर २०१२ च्या आदेशात अंशतः बदल करण्याचे ठरविले असून, त्यानुसार जड वाहनांची प्रवेशबंदी आता सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत लागू राहणार आहे.







0 Comments