महाविकास आघाडीला उद्या सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत बहुमत सिध्द करण्याचे राज्यपालांचे आदेश

 



महाविकास आघाडीला उद्या सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत बहुमत सिध्द करण्याचे राज्यपालांचे आदेश 

◾महाविकास आघाडी बहुमत सिध्द करण्याच्या आदेशासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत 

मुंबई ( राज्य रिपोर्टर ) : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षातील एक मोठी बातमी आहे.राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरे सकारनं बहुमत गमावलं असं मानलं जात आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. उद्या (गुरूवारी) बहुमत सिद्ध करण्याचे आदेश राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारला दिले आहेत. त्यामुळे ठाकरे सरकारसाठी गुरूवारचा दिवस निर्णायक ठरणार आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या प्रमुख नेत्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची मंगळवारी भेट घेतली. या भेटीमध्ये भाजपने महाविकासआघाडी सरकार अल्पमतात असून लवकरात लवकर बहुमत चाचणी घ्यावी, अशी मागणी केली. त्यानंतर राज्यपालांनी हे पत्र लिहलं आहे. राज्यपालांच्या या पत्रानंतर आता उद्धव ठाकरे सरकारला विधानसभेत बहुमत सिद्ध करावं लागेल. दरम्यान, आम्ही उद्या मुंबईत जाणार आहोत अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीमध्ये दिली आहे. शिंदे यांनी बुधवारी सकाळी गुवाहाटीमधील कामाख्या देवीचं दर्शन घेतलं. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना शिंदे यांनी ही माहिती दिली आहे. सत्तासंघर्ष निर्णायक वळणावर एकनाथ शिंदे शिवसेनेच्या आमदारांसह 21 जून रोजी सुरतला दाखल झाले होते. त्यामुळे शिवसेनेत एकच खळबळ उडाली होती. शिवसेनेनं शिंदेंना परत बोलावण्यासाठी बरेच प्रयत्न केले. पण, ते काही परत आले नाही. त्याच दिवशी 21 तारखेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन केल्याचे समोर आले आहे. पण फडणवीस यांनी फोन उचलला नाही. त्यानंतर मुख्यमत्र्यांनी त्यांना मेसेज केला पण त्यात मजकूर काय हे मात्र कळू शकले नाही. असाच प्रकार 2019 झाला होता. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधण्यासाठी बरेचदा फोन केले होते. पण त्यावेळे उद्धव ठाकरे यांनी फोन उचलले नव्हते. आता तीच वेळ उद्धव ठाकरेंवर आली.

Post a Comment

0 Comments